अस्थमा

अस्थमाचा झटका

मचा जेव्हा ट्रीगरशी संपर्क येतो तेव्हा अस्थमाचा झटका येऊ शकतो. वायूमार्गा सभोवतालचे स्नायू अचानक गच्च होतात आणि वायूमार्गाच्या लाइनिंगमधून श्लेष्म (म्युकस) अधिक प्रमाणात स्त्रवतो. ह्या सर्व घटकांमुळे तुमच्या लक्षणांची स्थिती अचानक बिघडते.

अस्थमाच्या झटक्याची लक्षणे अशी आहेतः

  • धाप लागणे
  • श्वासाची घरघर
  • तीव्र खोकला
  • छाती गच्च होणे
  • चिंता

लवकर लक्षणे ओळखून, तुम्ही अस्थमाचा झटका थांबवू शकता किंवा त्याची स्थिती अधिक बिघडण्यापासून प्रतिबंध करू शकता. अस्थमाचा तीव्र झटका जीवघेणी आणीबाणीची परिस्थिती निर्माण करू शकते. अस्थमाचा झटका आल्यास अशा वेळी काय करावे?

तुम्ही तुमचे कंट्रोलर इन्हेलरचे औषधोपचार नियमितपणे घेत असाल तर तुम्हाला अस्थमाचा झटका येण्याची शक्यता फार कमी आहे. तुम्हाला किंवा तुमच्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीला अस्थमाचा झटका आल्यास सर्वप्रथम काय कराल तर शांत राहणे आणि रिलॅक्स होणे, आणि त्यानंतर ह्या पायऱ्यांचे पालन करा.

  • ताठ बसा आणि तुमचे कपडे सैल करा.
  • अजिबात उशीर न करता तुमचे लिहून दिलेले रिलिवर इन्हेलर घ्या.
  • रिलिवर इन्हेलरचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला ५ मिनिटांच्या आत आराम वाटला नाही तर तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे रिलिवर इन्हेलरचा दुसरा डोस घ्या.
  • तरी सुद्धा आराम वाटला नाही तर तुम्ही उशीर न करता तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणे किंवा जवळच्या रूग्णालयाला भेट देणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रिलिवर इन्हेलरचा जास्त प्रमाणात डोस घेऊ नका.

तुम्हाला किंवा तुमच्या आसपासच्या व्यक्तीला खालील लक्षणे असल्यास, ताबडतोब जवळच्या रूग्णालयाला भेट देणे महत्त्वाचे आहेः

  • ओठ, चेहरा, किंवा नखांचा रंग बदलणे (निळा किंवा राखाडी)
  • श्वास घेण्यास खूप त्रास होणे
  • बोलताना किंवा चालताना त्रास होणे
  • श्वास घेण्यास त्रास होण्यामुळे खूप चिंता वाटणे किंवा भीती वाटणे
  • छातीत दुखणे
  • नाडी वेगाने चालणे आणि चेहरा निस्तेज होऊन घाम येणे

अस्थमाचा झटका कमी झाल्यानंतर, तुमच्या अस्थमाच्या कृती योजनेबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यामुळे तुम्ही भविष्यातील सर्व झटके येणे टाळू शकता.